YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 38:1-22

स्तोत्रसंहिता 38:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस. तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत; तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे. तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही; माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही; कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे. माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो. माझ्या कंबरेला दाह सुटला आहे; माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही. माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे. हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे; माझे कण्हणे तुझ्यापासून गुप्त नाही. माझे काळीज धडधडत आहे; माझी शक्ती मला सोडून गेली आहे; माझ्या डोळ्यांत तेजही राहिले नाही. माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात; माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात. माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात. मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. ज्या मनुष्याला ऐकू येत नाही, ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, त्याच्यासारखा मी झालो आहे. हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे; हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील. मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.” कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे. माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे. मी आपला दोष पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी खिन्न आहे. माझे वैरी जोमदार व बलवान आहेत; खोडसाळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झाले आहेत. जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बर्‍याची फेड वाइटाने करणारे मला विरोध करतात. हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस. हे प्रभू, माझ्या उद्धारा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.

स्तोत्रसंहिता 38:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस. कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे. माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही. कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे. माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत. मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो. कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे. मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो. हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही. माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे. माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात. जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात. मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही. परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील. कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील. कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे. मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे. परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत. माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात. हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस. हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.

स्तोत्रसंहिता 38:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका. संतापून मला दंड करू नका. तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत; तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत. तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही. माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे. माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे. मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे; मी दिवसभर शोक करीत असतो. माझ्या पाठीचा दाह होत आहे; माझ्या अंगी अजिबात आरोग्य राहिलेले नाही. मी पार गळून व चिरडून गेलो आहे; माझ्या हृदयाच्या वेदनेने मी कण्हत आहे. प्रभू माझी तीव्र इच्छा काय आहे, हे तुम्ही जाणता; माझा प्रत्येक उसासा तुम्ही ऐकता. माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे; मी आंधळा होत आहे असे मला वाटते. माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात; माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात. माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात. परंतु मी ऐकू न येणार्‍या बहिर्‍यासारखा झालो आहे; बोलता न येणार्‍या मुक्या माणसासारखा मी झालो आहे. ज्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, अशा माणसासारखा मी आहे. याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे; प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या. कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले, तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्‍यांना आनंद मिळू देऊ नका.” कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे आणि माझे दुःख सतत मजबरोबर आहे. मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे. अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत. माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत आणि मी सत्याच्या बाजूने उभे राहिलो, तरीही ते माझा द्वेष करीत आहेत. याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका. माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा.