स्तोत्रसंहिता 18:25-36
स्तोत्रसंहिता 18:25-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस. जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस. कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस. कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो. कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून जाऊ शकतो. देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे. कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे? तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो. तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो! तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो. तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे. तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 18:25-36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता, शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता. नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता. याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे; माझ्या परमेश्वराने माझ्या अंधाराचा प्रकाश केला आहे. तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो. परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत. याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे? परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात. तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात. ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात. माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे, तुमचा उजवा हात मला आधार देतो; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे. माझी पावले घसरू नयेत, म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही मार्ग विस्तृत केला आहे.
स्तोत्रसंहिता 18:25-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस; शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस; तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो. तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत.