स्तोत्रसंहिता 146:1-10
स्तोत्रसंहिता 146:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन. अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका. जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो. ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो. तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो. परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो. परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 146:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन. तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही. कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते; त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात. तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे, कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत. गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात, ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत. याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात. याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील.
स्तोत्रसंहिता 146:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य! त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले; तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपर्यांचे रक्षण करतो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो; परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो; हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा!1