YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 140:1-13

स्तोत्रसंहिता 140:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात. त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे. हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो. वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे. खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.

स्तोत्रसंहिता 140:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा. ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात व दररोज युद्ध भडकावित असतात. त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत. या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे, आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या. सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा. या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला ज्यांनी मला वेढा घातला आहे, त्यांचे मस्तक गर्वाने उंचावलेले आहे; त्यांच्या मुखातून निघालेले कपट त्यांच्यावरच उलटो. त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत; ते अग्नीत फेकले जावोत, जिथून सुटका होणार नाही, अशा खोल खाचात ते टाकले जावोत. या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये; संकटे त्यांना शोधून त्यांचा नाश करोत. मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात. निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील.

स्तोत्रसंहिता 140:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यापासून सोडव; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर. ते आपल्या मनात दुष्कर्मे योजतात; ते सतत लढाई उपस्थित करतात, ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे. (सेला) हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात. गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला) मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस. हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नकोस, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस; नाहीतर तो उन्मत्त होईल. (सेला) ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. त्यांच्यावर इंगळ पडोत; ते अग्नीत टाकले जावोत, ज्यांतून त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचांत ते टाकण्यात येवोत. दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे. नीतिमान तुझ्या नावाचे उपकारस्मरण खचीत करतील; सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील.