स्तोत्रसंहिता 139:14-18
स्तोत्रसंहिता 139:14-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.
स्तोत्रसंहिता 139:14-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो. गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती. तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली. हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते! जर मी त्याची गणती केली, तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल— मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो.
स्तोत्रसंहिता 139:14-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे! ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.