स्तोत्रसंहिता 119:105-112 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 119:105-112 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे. मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव. हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव. माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
स्तोत्रसंहिता 119:105-112 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे. मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन. याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझे जतन करा. याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा. जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही. दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही. तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत, माझ्या अंतःकरणाचा उल्हास आहेत. शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे.
स्तोत्रसंहिता 119:105-112 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे.