YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 105:1-45

स्तोत्रसंहिता 105:1-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या. त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला; त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो. परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या. त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो, तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत. तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो. त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली. ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला. तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.” हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते. ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले. त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली. तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका. त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले. तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले. त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले, अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे. नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. देवाने आपले लोक फारच वाढवले, आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले. आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले. त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले. त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली. त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही. त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले. त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते. तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या. त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला. त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली. तो बोलला आणि टोळ आले. असंख्य नाकतोडे आले. टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले; त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले. त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही. ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती. त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला. इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले. त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले. कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले. त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या. ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता 105:1-45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा. त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा. त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा. परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा. अहो त्यांचे सेवक, अब्राहामाच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, स्मरण करा. कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. जी अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती, ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात. हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली, आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला: “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.” त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते. ते एका देशातून दुसर्‍या देशात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत असताना, याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले: “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” त्यांनी त्यांच्या देशावर दुष्काळ आणला, आणि त्यांचा अन्नपुरवठा तोडून टाकला. तेव्हा त्यांनी एका पुरुषाला— योसेफाला पाठविले. इजिप्तींनी योसेफाच्या पायांना खोडे घालून इजा केली, त्याची मान लोखंडी गळपट्ट्यात अडकविली. याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत, त्यांनी दिलेले अभिवचन पूर्णपणे पारखले जाईपर्यंत हे घडले. मग राजाने त्याला बोलाविणे पाठविले आणि त्याला मुक्त केले, प्रजेच्या शासकाने त्याला सोडविले. राजाने त्याला महालाचा प्रशासक म्हणून नेमले, सर्व मालमत्तेवर त्याला अधिकार दिला. त्याच्या राजपुत्रांचा सल्लागार, आणि राजाच्या मंत्र्यांना बोध देण्यासाठी त्याची नेमणूक झाली. नंतर याकोब, म्हणजे इस्राएल इजिप्तमध्ये आला; आणि उपरा म्हणून हाम वंशजांच्या देशात राहिला. याहवेहने इस्राएली लोकांना अत्यंत समृद्ध केले; त्यांच्या शत्रूपेक्षाही त्यांची लोकसंख्या अधिक झाली, त्यांच्या सेवकांविरुध्द कट करण्यासाठी परमेश्वराने इजिप्ती लोकांचे मन फिरविले. तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला व अहरोनाला निवडून पाठवले. त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले, हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली. परमेश्वराने अंधकार पाठवून त्या संपूर्ण देशाला अंधकारमय केले— कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाची अवहेलना केली नाही का? त्यांनी इजिप्तच्या सर्व पाण्याचे रक्त केले, आणि परिणामतः त्यातील मासे मरून गेले. मग त्या राष्ट्रात प्रचंड संख्येने बेडके उत्पन्न झाली, राजाच्या शयनकक्षात देखील ती पोहोचली. ते बोलले आणि गोमाश्यांचे, आणि कीटकांचे थवे प्रचंड प्रमाणात संपूर्ण देशावर आले. पावसाच्या पाण्याचे गारात रूपांतर केले, आणि विजेच्या अग्निलोळांनी त्या राष्ट्रावर वर्षाव केला. त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडे त्यांनी उद्ध्वस्त केली, देशातील सर्व झाडे कोलमडून पडली. त्यांनी आदेश दिला आणि टोळांनी आक्रमण केले, टोळांचे थवेच्या थवे आले; त्यांनी देशातील सर्व हिरवळ खाऊन टाकली, आणि सर्व पिके गिळंकृत केली. मग त्यांनी त्यांच्या देशातील प्रत्येक ज्येष्ठ संतानास ठार केले, जे त्यांच्या पुरुषत्वाचे प्रथमफळ होते. त्यांनी इस्राएलास विपुल चांदी आणि सोन्यासह इजिप्तमधून बाहेर काढले, त्यावेळी त्यांच्या गोत्रातील कोणीही अडखळले नाही. इस्राएली लोक गेल्यावर इजिप्ती लोकांना आनंद झाला, कारण इस्राएलाच्या भयाने ते ग्रासले होते. याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले, आणि रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभ दिला. त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले; त्यांना स्वर्गातील भाकर देऊन तृप्त केले. त्यांनी खडक फोडला आणि पाणी उफाळून बाहेर आले; त्याची नदी होऊन ती वैराण प्रदेशातून वाहू लागली. कारण आपला सेवक अब्राहाम याला दिलेल्या पवित्र अभिवचनाची त्यांना आठवण होती. त्यांनी त्यांच्या लोकांना आनंदाची गाणी गात, व आपल्या निवडलेल्यांना हर्षनाद करीत बाहेर आणले; परमेश्वराने अनेक राष्ट्रांची भूमी यांना दिली, परक्यांनी परिश्रम केलेल्या संपत्तीचे ते वारस झाले— जेणेकरून इस्राएली लोक त्यांचे विधिनियम व त्यांची आज्ञा दक्षतेने पाळतील.

स्तोत्रसंहिता 105:1-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा; त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राहाम ह्याचे वंशजहो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशजहो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत. तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो; हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाजवळ शपथ वाहिली; ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली; तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून मी तुला देईन.” त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते. ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही, त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.” त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला; त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले. राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले; राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले, अशासाठी की, त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यांना शहाणपण सांगावे. नंतर इस्राएल मिसर देशात आला; याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला. परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढवले, त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले. त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले. त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखवली. त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला, आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले.1 त्याने मिसर्‍यांच्या पाण्यांचे रक्त केले व त्यांतील मासे मारून टाकले. त्यांचा देश, त्यांचे राजवाडे बेडकांनी व्यापून टाकले. त्याने आज्ञा करताच गोमाश्या आल्या, त्यांच्या सर्व प्रदेशात उवा झाल्या. त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या; त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले. त्याने त्यांचे द्राक्षवेल व अंजीर ह्यांचा विध्वंस केला, त्यांच्या देशातील झाडे मोडून टाकली. त्याने आज्ञा करताच टोळ व असंख्य नाकतोडे आले. त्यांनी त्यांच्या देशातील सर्व हिरवळ खाल्ली, त्यांच्या भूमीचे उत्पन्न खाल्ले. त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथमजन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथमफळ मारले. त्याने लोकांना सोन्यारुप्यासहित बाहेर नेले; त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता. त्यांच्या जाण्याने मिसरी लोकांना आनंद झाला; कारण त्यांना त्यांचे भय पडले होते. त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला. त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले, आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले. त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले; ते नदीप्रमाणे रुक्ष प्रदेशातून वाहू लागले. कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. त्याने आपल्या लोकांना आनंद करत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले. त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले; त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले, ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम पाळावेत, आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे. परमेशाचे स्तवन करा!2

स्तोत्रसंहिता 105:1-45

स्तोत्रसंहिता 105:1-45 MARVBSIस्तोत्रसंहिता 105:1-45 MARVBSIस्तोत्रसंहिता 105:1-45 MARVBSIस्तोत्रसंहिता 105:1-45 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा