स्तोत्रसंहिता 10:11-18
स्तोत्रसंहिता 10:11-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही. हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस. दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो? तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे. दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही. परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत. हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
स्तोत्रसंहिता 10:11-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही, त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.” याहवेह उठा, परमेश्वरा, आपला हात उगारा! पीडितांना विसरू नका. परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो? “परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,” असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो? परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता; तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या. ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत; कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात. त्या दुष्टाचे भुजबळ मोडून टाका; त्याच्या दुष्टपणाचा असा हिशोब घ्या, की त्याची दुष्टता शोधून सापडणार नाही. याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत; त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत. याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा. गांजलेले व अनाथांचे रक्षण करा, म्हणजे मर्त्य मानवाची त्यांना पुन्हा कधीही दहशत वाटणार नाही.
स्तोत्रसंहिता 10:11-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.” हे परमेश्वरा, ऊठ; हे देवा, आपला हात उगार; दीनांना विसरू नकोस. देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? “तू झडती घेणार नाहीस” असे तो आपल्या मनात का म्हणतो? तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस. दुर्जनाचा बाहू मोडून टाक; दुष्टाचे दुष्कर्म निःशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरव. परमेश्वर युगानुयुग राजा आहे; त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत. हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस; त्यांचे मन तू स्थिर करतोस; पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.