YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 8:4-36

नीतिसूत्रे 8:4-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते. अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन, कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही. ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत. रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे; त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही. मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे. परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते. चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत; मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत. माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात. माझ्याद्वारे राजपुत्र आणि सरदार व सर्व कोणी न्यायाधीश अधिकार चालवतात. माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते. धन व सन्मान, टिकणारी संपत्ती व सदाचरण ही माझ्याजवळ आहे. माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षाही उत्तम आहे; मी जे काही उत्पन्न करतो ते शुद्ध रुप्यापेक्षा उत्तम आहे. जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, ती वाट न्यायाकडे नेते, म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत देते. आणि त्यांची भांडारे भरते. परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले पहिले कृत्य असे मला निर्माण केले. अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला; पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला. परमेश्वराने पृथ्वी व शेत किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले. जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली. जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले. जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते. तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे. मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत. माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; दुर्लक्ष करू नका. जो माझे ऐकतो तो सुखी होईल तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो. कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो. पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचा

नीतिसूत्रे 8:4-36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते. तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे लावा. ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात. माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत. चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.” कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे; तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही. मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत. याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते. सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत; माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे. माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात; माझ्याच साहाय्याने अधिपती, आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात. जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते, आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते. माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान, कायम टिकणारी संपत्ती आणि वैभव आहे. माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे; आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे. मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते, आणि न्याय्यमार्गाला धरून राहते, माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते. आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते. याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये, त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली; अनादिकालापासून माझी रचना केलेली होती. जेव्हा जग अस्तित्वात आले तेव्हाच. जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, तेव्हा ओसांडून वाहणारे झर्‍यांचे पाणीही नव्हते; पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते, डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता, त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी, त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली आणि पृथ्वीगर्भातील झर्‍यांना घट्ट बसविले, जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला, तेव्हा मी सतत त्यांच्याभोवती होते; दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते. नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते, त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे. “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात. माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा; त्याचा अव्हेर करू नका. जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत, ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन, माझ्या दारावर प्रतीक्षा करतात. कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते. परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचा

नीतिसूत्रे 8:4-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणार्‍या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत; मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते. मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे. माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात. अधिपती न्याय ठरवतात. माझ्या साहाय्याने अधिपती, सरदार, व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवतात. माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते. संपत्ती व मान, टिकणारे धन व न्यायत्व, ही माझ्या हाती आहेत. माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे; माझी प्राप्ती उत्कृष्ट रुप्यापेक्षा उत्तम आहे. मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते; माझ्यावर प्रीती करणार्‍यांना मी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांची भांडारे भरते. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला निर्माण केले. अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले; त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली; जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले; जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले; तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते; परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचा