YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 4:10-19

नीतिसूत्रे 4:10-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे. जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही. आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस. शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे. दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको, आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको. ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस; त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा. कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे. पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.

सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा

नीतिसूत्रे 4:10-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो. जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस. बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे. दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस. त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा, कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात. नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे. दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही.

सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा

नीतिसूत्रे 4:10-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नकोस; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे, दुर्जनांच्या मार्गात शिरू नकोस; दुष्टांच्या मार्गाने चालू नकोस. त्यापासून दूर राहा, त्याच्या जवळून जाऊ नकोस; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग. कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते. कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात, परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे. दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.

सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा