नीतिसूत्रे 31:21-31
नीतिसूत्रे 31:21-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते. बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे. ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही. तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
नीतिसूत्रे 31:21-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते. तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्यांबरोबर बसतो. ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्यांना कमरबंद पुरविते. बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते. घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही. तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो: “उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.” मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते. तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.
नीतिसूत्रे 31:21-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही; कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापार्यांना कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते, ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो : “बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.” सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.