नीतिसूत्रे 3:11-20
नीतिसूत्रे 3:11-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस, जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो. ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते. ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही. तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत. तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत. जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे. परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले. त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
नीतिसूत्रे 3:11-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस; कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात! ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य. कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते. ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही. तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे; आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत. तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे. जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील. सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला, शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली; त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली, आणि मेघांनी दवबिंदू पाडले.
नीतिसूत्रे 3:11-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस; कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. ज्याला ज्ञान प्राप्त होते, तो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय. परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले, व आकाश दहिवर वर्षते.