नीतिसूत्रे 1:1-33
नीतिसूत्रे 1:1-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, आणि ते रक्त पाडायला घाई करतात. एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते; ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते, “अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार? तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; मी आपले विचार तुम्हावर ओतीन; मी आपली वचने तुम्हास कळवीन. मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही. परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले. म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन. जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील. कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”
नीतिसूत्रे 1:1-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी— शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे— ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात. माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या; चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू; आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू; आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”— माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस; कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात. जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे! ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात; ते केवळ स्वतःवरच हल्ला करतात! गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात, त्या सर्वांचे हे मार्ग आहेत; असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते. बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते. भर चौकात ती तिचा आवाज उंचावते; भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते शहराच्या वेशीजवळ ती भाषण करते: “अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार? कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार? मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत, यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन— जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही, कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून, त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील. कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल; परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”
नीतिसूत्रे 1:1-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे : ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे; सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत. भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे; ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा; बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस. ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू; त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू; तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;” तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस. कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात. एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणार्या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते; गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात, घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते : “अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार? माझा वाग्दंड ऐकून वळा; पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हांला कळवीन. मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही; तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला, व माझा वाग्दंड मुळी जुमानला नाही; ह्यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन; तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन; वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील. तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही; कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही; त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला; म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील; कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते; पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”