YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 3:15-21

फिलिप्पैकरांस पत्र 3:15-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील. तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.

फिलिप्पैकरांस पत्र 3:15-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील. जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे. प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी हे पूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही रडत सांगतो की अनेक लोक असे जगतात जसे ते ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचे शत्रू आहेत. त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे. परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील.

फिलिप्पैकरांस पत्र 3:15-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तीही तुम्हांला प्रकट करील. तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे. बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत; ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.

फिलिप्पैकरांस पत्र 3:15-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील. तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या. बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत. पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते. आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे दैन्यावस्थेतील शरीर त्याच्या स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.