फिलिप्पैकरांस पत्र 3:1-21
फिलिप्पैकरांस पत्र 3:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा. कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा. आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी. म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे. बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील. तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
फिलिप्पैकरांस पत्र 3:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बंधू व भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा लिहिण्याचा मला त्रास होत नाही आणि हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. त्या कुत्र्यांपासून, दुष्ट कृत्ये करणारे, देहाची विच्छिन्नता करणार्यांपासून सावध राहावे. कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही. तरी देखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत. मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो; आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो. परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे. यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे. आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते. मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे. मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे. बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे. आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील. जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे. प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी हे पूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही रडत सांगतो की अनेक लोक असे जगतात जसे ते ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचे शत्रू आहेत. त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे. परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील.
फिलिप्पैकरांस पत्र 3:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा. कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तीही तुम्हांला प्रकट करील. तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे. बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत; ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.
फिलिप्पैकरांस पत्र 3:1-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अगोदर लिहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मी कंटाळा करीत नाही, परंतु हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. ह्या कुत्र्यांपासून सावध रहा, दुष्कर्म्यांपासून सावध रहा, केवळ शरीराला बाधा पोहचवणाऱ्यांपासून सावध रहा. आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत. अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे. आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा, मी त्याच्यामध्ये आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे विश्वासावर आधारित व देवाकडून मिळणारे असे नीतिमत्त्व असावे. माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे. म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे. एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो. जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील. तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या. बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत. पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते. आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे दैन्यावस्थेतील शरीर त्याच्या स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.