फिलिप्पैकरांस पत्र 1:1-26
फिलिप्पैकरांस पत्र 1:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम; देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो. आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे. देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे. माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले; आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत. कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे; तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे.
फिलिप्पैकरांस पत्र 1:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्त येशूंचे दास पौल व तीमथ्य, यांच्याकडून फिलिप्पै शहरातील ख्रिस्त येशूंमध्ये असणारे सर्व परमेश्वराचे पवित्र लोक, अध्यक्ष व मंडळीचे सेवक यास: परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात. माझी खात्री आहे की ज्या परमेश्वराने तुम्हामध्ये चांगले कार्य सुरू केले आहे, त्यास ते ख्रिस्त येशूंच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेतील. तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्या हृदयात तुम्हाला स्थान आहे. मी तुरुंगात होतो अथवा शुभवार्तेची पुष्टी करीत व प्रमाण देत होतो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर परमेश्वराच्या कृपेमध्ये सहभागी झाला होता. ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे. आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी. कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे. आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे. आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभूमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने अधिक निर्भयपणे शुभवार्ता जाहीर करत आहेत. हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात. दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्त्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात. परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन. कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका होईल हे मला माहीत आहे. याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे! जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे! परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन. मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल.
फिलिप्पैकरांस पत्र 1:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो; पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे मी तसे करतो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हांला बाळगून आहे. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी; असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे; आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे; म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली; आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात; पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावीत अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे; हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.
फिलिप्पैकरांस पत्र 1:1-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला मिळो. प्रत्येक वेळी मला जेव्हा तुमची आठवण येते, तेव्हा मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारातील तुमच्या सहभागितेमुळे मी तसे करतो. तुम्हां सर्वांसाठी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस मी नेहमी आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. तुमच्या अंतःकरणात मला तुम्ही स्थान दिले आहे! म्हणून मला तुमच्याविषयी जे वाटते ते योग्यच आहे. कारण माझ्या तुरुंगवासात व शुभवर्तमानाचे समर्थन करण्यात ते तसेच प्रस्थापित करण्यात तुम्ही माझ्याबरोबर कृपेचे भागीदार आहात. माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे. बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या राजवाड्यातील सर्व सैनिकांना व इतर सर्व लोकांना माझा तुरुंगवास ख्रिस्तासंबंधाने आहे, हे समजले आहे. माझ्या तुरुंगवासामुळे पुष्कळ बंधुजनांचा प्रभूवरील भरवसा वाढला असून देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास त्यांना धैर्य मिळत आहे. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात. मात्र इतर काही जण ख्रिस्ताची घोषणा प्रामाणिकपणे करीत नाहीत. तुरुंगवासात माझ्या यातना वाढाव्यातम्हणून ते स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन करीत आहेत. मला काही फरक पडत नाही. अयोग्य हेतूने असो किंवा योग्य हेतूने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, ह्यात मी आनंद मानतो व मानत राहीन; कारण तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साहाय्याने मला तुरुंगातून मुक्त होता येईल, हे मला ठाऊक आहे. माझी प्रबळ अपेक्षा व आशा ही आहे की, मी माझ्या जबाबदारीत उणा न पडता सर्व समयी आणि विशेषतः आता परिपूर्ण धैर्याने सर्वस्व पणास लावून जगण्याने अथवा मरण्याने ख्रिस्ताचा महिमा वाढवीत राहावे. मला तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे. मात्र मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आणि श्रद्धेमधील तुमची प्रगती व आनंद वाढत जावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे. जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन.