YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-11

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम; देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो. आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे. देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ख्रिस्त येशूंचे दास पौल व तीमथ्य, यांच्याकडून फिलिप्पै शहरातील ख्रिस्त येशूंमध्ये असणारे सर्व परमेश्वराचे पवित्र लोक, अध्यक्ष व मंडळीचे सेवक यास: परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात. माझी खात्री आहे की ज्या परमेश्वराने तुम्हामध्ये चांगले कार्य सुरू केले आहे, त्यास ते ख्रिस्त येशूंच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेतील. तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्या हृदयात तुम्हाला स्थान आहे. मी तुरुंगात होतो अथवा शुभवार्तेची पुष्टी करीत व प्रमाण देत होतो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर परमेश्वराच्या कृपेमध्ये सहभागी झाला होता. ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे. आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी. कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो; पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे मी तसे करतो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हांला बाळगून आहे. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी; असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे; आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला मिळो. प्रत्येक वेळी मला जेव्हा तुमची आठवण येते, तेव्हा मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारातील तुमच्या सहभागितेमुळे मी तसे करतो. तुम्हां सर्वांसाठी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस मी नेहमी आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. तुमच्या अंतःकरणात मला तुम्ही स्थान दिले आहे! म्हणून मला तुमच्याविषयी जे वाटते ते योग्यच आहे. कारण माझ्या तुरुंगवासात व शुभवर्तमानाचे समर्थन करण्यात ते तसेच प्रस्थापित करण्यात तुम्ही माझ्याबरोबर कृपेचे भागीदार आहात. माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे.