गणना 9:1-14
गणना 9:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला, “इस्राएल लोकांस वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग. या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.” मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले. तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले. ती माणसे मोशेस म्हणाली, “एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर कां ठेवत आहेस?” मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.” मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा. त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा. त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत. परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे. जर तुमच्यामध्ये एखाद्या परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.
गणना 9:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले, “इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा. नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.” तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले. त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले. आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?” मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.” मग याहवेहने मोशेला म्हटले, “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा, परंतु त्यांनी तो दुसर्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे. त्यांनी दुसर्या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत. पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. “ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ”
गणना 9:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनाय रानात मोशेला म्हणाला, “नेमलेल्या समयी इस्राएल लोकांनी वल्हांडण सण पाळावा. ह्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी नेमलेल्या समयी त्याच्यासंबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांना अनुसरून तुम्ही तो पाळावा.” मग मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी सीनाय रानात वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते, त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना, म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे आले; ते मोशेला म्हणाले, “एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत तर इस्राएल लोकांबरोबर नेमलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हांला का मनाई असावी?” मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा; तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग की, तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजांतला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा. दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा; त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये; वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा. परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी. तुमच्यामध्ये राहणार्या कोणा परदेशीयाला परमेश्वरा-प्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यांना अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा.”