YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 20:1-13

गणना 20:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएलाचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले. त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते. “तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का? तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.” म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले. परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला, तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील. मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली. मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली. पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही. त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.

सामायिक करा
गणना 20 वाचा

गणना 20:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोकांचा समुदाय सीन अरण्यात आला आणि त्यांनी कादेश येथे तळ दिला. तिथे मिर्याम मरण पावली व तिला तिथेच पुरण्यात आले. त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले. लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते! याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय? इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!” मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले. मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.” मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले. मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?” मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले. परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.” हे मरीबाहचे पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले.

सामायिक करा
गणना 20 वाचा

गणना 20:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पहिल्या महिन्यात इस्राएल लोकांची सर्व मंडळी त्सीन रानात आली; त्यांनी कादेश येथे मुक्काम केला; तेथे मिर्याम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठमाती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते! तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून? मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.” तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दाराशी पालथे पडले, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आपली काठी घे. तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज.” परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले, आणि त्यांना मोशे म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे काय?” मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.” त्या झर्‍याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.

सामायिक करा
गणना 20 वाचा