YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 19:1-22

गणना 19:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या. ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणीबाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्यासमोर मारावे. नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे. नंतर संपूर्ण कालवड त्याच्यासमोर जाळून, कातडी, मांस रक्त आणि आतडे सर्वकाही जाळले पाहिजे. नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या. याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. ज्या मनुष्याने कालवडीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे. ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे. जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी ती राख घेऊन आपणास शुद्ध करावे व नंतर सातव्या दिवशी तो शुद्ध होईल, पण जर तो तिसऱ्या दिवशी आपणास शुद्ध करणार नाहीतर तो सातव्या दिवशी तो शुद्ध होणार नाही. जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर मनुष्य अशुद्ध असताना परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या मनुष्यास इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध मनुष्यावर खास पाणी शिंपडले नाहीतर तो अशुद्ध राहील. जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील. आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल. खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो मनुष्य युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मरण पावलेल्या मनुष्याच्या अस्थींना हात लावला तरी तो मनुष्य सात दिवस अशुद्ध होईल. त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका. शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा. नंतर शुद्ध मनुष्याने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध मनुष्याच्या अंगावर शिंपडावे. तो मनुष्य सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल. एखादा मनुष्य अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाहीतर त्यास इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील. तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या मनुष्यावर पाणी शिंपडले त्या मनुष्याने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही मनुष्याने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. जर त्या अशुद्ध मनुष्याने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो मनुष्य सुद्धा अशुद्ध होईल. तो मनुष्य संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

सामायिक करा
गणना 19 वाचा

गणना 19:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह मोशे आणि अहरोनला म्हणाले: “याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी. ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा. त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे. एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी. याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा. त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे. जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. “शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे. जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा. “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे. त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील. मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो. “एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे, आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे. “जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे. “अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे. आणि जो मनुष्य विधीनुसार शुद्ध आहे, त्याने एजोबाची फांदी घेऊन ती पाण्यात बुचकळावी व ते तंबू व त्याची पात्रे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर शिंपडावे. त्याचप्रमाणे ज्यांनी मानवी हाड किंवा कबर किंवा ज्याचा वध झाला किंवा नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला स्पर्श केला त्यांच्यावरही ते पाणी शिंपडावे. जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्‍या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील. पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत. हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. अशुद्ध व्यक्ती ज्या वस्तूला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल आणि जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करेल त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”

सामायिक करा
गणना 19 वाचा

गणना 19:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला : “परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा : इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या; ती एलाजार याजकाकडे द्यावी; त्याने तिला छावणीबाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्यासमोर वधावे; मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे; आणि त्याच्यादेखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे. तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. नंतर याजकाने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी आणि छावणीत यावे; पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुऊन अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी; ही राख इस्राएल मंडळीच्या पापहरणार्थ अशौचक्षालनाचे (अशुद्धी दूर करण्याचे) पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी. कालवडीची राख जमा करणार्‍याने आपले कपडे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; इस्राएल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय ह्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय. एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे; त्याने तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी ती राख घेऊन स्वतःला शुद्ध करावे; तथापि तिसर्‍या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही. कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल; असल्या मनुष्याचा इस्राएल लोकांतून उच्छेद व्हावा; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर शिंपडले नसल्यामुळे तो अशुद्ध होय; त्याच्या ठायी त्याचे अशुद्धपण तसेच राहते. एखादा मनुष्य डेर्‍यात मरण पावला तर त्याच्यासंबंधाने नियम हा : जो कोणी त्या डेर्‍यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुद्ध राहावे. तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावीत. खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या शवाला, मृत देहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुद्ध असावे. अशुद्ध झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झर्‍याचे पाणी ओतावे; आणि शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेर्‍यावर व तेथील सर्व पात्रे, माणसे ह्यांच्यावर शिंपडावे; तसेच ज्याने हाडाला, वधलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे; शुद्ध असलेल्या माणसाने अशुद्ध माणसावर तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी ते शिंपडावे; ह्याप्रमाणे सातव्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे; त्याने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल. जर अशुद्ध झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा, कारण तो परमेश्वराचे पवित्रस्थान भ्रष्ट करणारा होय; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकले नाही म्हणून तो अशुद्ध होय. त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ज्या कशाला तो अशुद्ध मनुष्य स्पर्श करील ते अशुद्ध ठरेल, व जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”

सामायिक करा
गणना 19 वाचा