YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 12:1-13

गणना 12:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले. ते म्हणाले, “परमेश्वर फक्त मोशेबरोबरच बोलला काय? तो आमच्याबरोबरही बोलला नाही काय? आता परमेश्वराने ते जे काय बोलले ते ऐकले.” आता पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यापेक्षा मोशे अधिक नम्र होता. तेव्हा परमेश्वर एकाएकी मोशे, अहरोन व मिर्याम ह्याच्याशी बोलला. “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा ते तिघे बाहेर आले. परमेश्वर एका ढगाच्या खांबातून खाली आला मंडपाच्या प्रवेशदारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, अहरोन व मिर्याम तेव्हा ते दोघे पुढे आले. परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका. जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत, मी स्वतः त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो, आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो माझा सेवक मोशे तसा नाही.” तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे. मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही. तो माझे स्वरूप पाहत असतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही? परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि नंतर तो त्यांना सोडून गेला. ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली. अहरोन मोशेला म्हणाला, अहो, माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा व त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको. कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृतवत होऊ नये. म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर.

सामायिक करा
गणना 12 वाचा

गणना 12:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले. (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.) याहवेह लगेचच मोशे, अहरोन आणि मिर्यामला म्हणाले, “तुम्ही तिघेही सभामंडपाकडे बाहेर या.” तेव्हा ते तिघे बाहेर गेले. मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले, याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो. परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे. मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?” मग याहवेहचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला आणि याहवेह त्यांना सोडून निघून गेले. जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते, तेव्हा तो मोशेला म्हणाला, “माझे स्वामी, मी तुला विनंती करतो, कृपया, आम्ही मूर्खपणाने केलेले पाप आमच्याविरुद्ध मोजू नको. जसे एक तान्हे मृत बाळ आपल्या आईच्या उदरातून जन्माला येताच त्याचे अर्धे शरीर नष्ट झालेले असते, असे तिला राहू देऊ नको.” तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!”

सामायिक करा
गणना 12 वाचा

गणना 12:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशेने कूशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. कारण त्याने कूशी लोकांतील स्त्री बायको करून घेतली होती. ते म्हणाले, “परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशीपण नाही का बोलला?” परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना परमेश्वर अचानक म्हणाला, “तुम्ही तिघे दर्शनमंडपाकडे या.” तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलावले; तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही; माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?” परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली; अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले आहे, त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस.1 कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये.” मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.”

सामायिक करा
गणना 12 वाचा