मार्क 9:2-9
मार्क 9:2-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती. तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते. पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.” अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही. ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
मार्क 9:2-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले, तिथे ते एकटे असताना त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले. त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही. तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले. तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते, कारण ते भयभीत झाले होते. इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!” मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही. ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.
मार्क 9:2-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपान्तर झाले. आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलीया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” काय बोलावे हे त्याला सुचले नाही; कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’ मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तेव्हा येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’
मार्क 9:2-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे इतकी चकचकीत व पांढरी शुभ्र झाली की, तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शक्य झाले नसते. मोशे व एलिया त्यांच्या दृष्टीस पडले. ते येशूबरोबर संभाषण करत होते. पेत्र येशूला म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आम्ही तीन मंडप उभारतो. आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” काय बोलावे, हे त्याला सुचले नाही कारण ते फारच भयभीत झाले होते. तेथे एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया धरली. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका.” त्यांनी अकस्मात सभोवती नजर फिरवली तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ फक्त येशूशिवाय दुसरे कोणी दिसले नाहीत. ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना बजावले की, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”