मार्क 8:22-38
मार्क 8:22-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली. मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?” त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.” नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले. मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?” त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.” मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.” येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.” तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे. त्याने हे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावू लागला. परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.” नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
मार्क 8:22-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली. येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?” तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.” तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. “या गावात जाऊ नकोस,” येशूंनी अशी ताकीद देऊन त्याला त्याच्या घरी पाठविले. येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या गावात गेले. वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; तर आणखी काही संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” “परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.” “ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले. यानंतर येशू त्यांना शिकवू लागले की, मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावी, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जिवे मारले जावे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे. ते या गोष्टीविषयी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलले आणि पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला. येशूंनी वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि मग पेत्राला ते धमकावून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टिआड हो. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.” नंतर शिष्यांना आणि जमावाला त्यांनी जवळ बोलाविले आणि म्हणाले: “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आणि शुभवार्तेसाठी आपल्या जीवाला मुकेल, तो त्याचा जीव वाचवेल. कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून चांगले काय निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या गौरवात व पवित्र देवदूतांच्या समवेत परत येईन तेव्हा लाज वाटेल.”
मार्क 8:22-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व ‘आपण त्याला स्पर्श करावा’ अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?” तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.” नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले; तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकाही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की, “ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस.” नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जाण्यास निघाले; तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” तेव्हा ‘माझ्याविषयी कोणाला सांगू नका’ अशी त्याने त्यांना ताकीद दिली. तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, ‘मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.’ ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, “सैताना, माझ्यापुढून चालता हो; कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे.” मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.”
मार्क 8:22-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू व त्याचे शिष्य बेथसैदा येथे आले. तेथे लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणले व त्याने त्याला स्पर्श करावा, अशी विनंती केली. त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकी लावून त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?” तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत, असे वाटते, परंतु ती मला चालत असलेल्या झाडांसारखी दिसत आहेत”, त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले. त्या माणसाने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले. त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.” येशू व त्याचे शिष्य फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील खेड्यापाड्यांत जायला निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे, असे लोक म्हणतात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, आणखी काही लोक संदेष्ट्यांपैकी एक, असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” तेव्हा “माझ्याविषयी कोणाला सांगू नका”, अशी त्याने त्यांना ताकीद दिली. नंतर येशू त्याच्या शिष्यांना अशी शिकवण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावीत, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे. येशूने उघडपणे हे सर्व सांगितले आणि पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याची निर्भर्त्सना करू लागला. त्याने वळून त्याच्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला खडसावले, “अरे सैताना, बाजूला हो!, तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.” त्याने त्याच्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे. स्वतःचा क्रूस उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या विश्वासहीन व दुष्ट पिढीत ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो पवित्र देवदूतांसह त्याच्या पित्याच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.”