मार्क 8:1-10
मार्क 8:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.” त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले. आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला.
मार्क 8:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.” शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?” येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.” त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले. त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले. लोक जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. तिथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.
मार्क 8:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवसांत पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या सात भाकरी घेतल्या व उपकारस्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या; आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांवर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला.
मार्क 8:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांचा विशाल समुदाय जमला होता व लोकांजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेत मूर्च्छित होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” त्याच्या शिष्यांनी विचारले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणणार?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” त्याने लोकांना जमिनीवर बसायला सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या व आभार मानून त्या मोडल्या व वाढण्याकरता त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. त्यांनी लोकांना त्या वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. त्यानंतर येशूने लोकांना निरोप दिला आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला.