YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 7:1-13

मार्क 7:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले. आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध, म्हणजे विधीग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले. कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत. बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात. मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?” येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे. मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’ परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’ तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा

मार्क 7:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?” त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.” आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे! मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’ आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’ परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा

मार्क 7:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्‍याच दुसर्‍या रूढी ते पाळतात. ह्यावरून परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा : ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’ तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’ तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा

मार्क 7:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या रूढीला अनुसरून हात धुतल्यावाचून जेवत नसत. बाजारातून आणलेल्या वस्तू प्रथम धुतल्याशिवाय ते खात नसत. तसेच पेले, घागरी व पितळेची भांडी धुणे, अशा बऱ्याच इतर रूढी ते पाळत असत. म्हणूनच परुश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने योग्य भाकीत करून ठेवले आहे. त्याचा लेख असा: हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते धर्मशास्त्र म्हणून मनुष्यांचे नियम शिकवतात. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.” नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही तुमची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडता! कारण मोशेने सांगितले आहे, ‘तू आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या वडिलांना अथवा आईला म्हणाला, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे देवाला अर्पण केले आहे’, तर तुम्ही त्याला आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काही करण्यापासून सूट देता. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा