YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 4:21-41

मार्क 4:21-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणखी येशू त्यास म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? प्रत्येक गोष्ट जी झाकलेले आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल. ज्याला कान आहेत तो ऐको.” तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल. कारण ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.” आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो. रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच विळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते.” आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी, तो पेरल्यावर उगवून सर्व झाडांत मोठा होतो. त्यास मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्यावर घरटी बांधू शकतात.” असले पुष्कळ दाखले देऊन, जसे त्यांच्याने ऐकवले तसे, तो त्यांना वचन सांगत असे. आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे. त्यादिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते. तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?” मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?” परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?

सामायिक करा
मार्क 4 वाचा

मार्क 4:21-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का? असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” ते त्यांना पुन्हा म्हणाले, “तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल आणि त्यापेक्षा अधिक जास्त तुम्हाला देण्यात येईल. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल नसेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.” येशू आणखी म्हणाले, “परमेश्वराचे राज्य असे आहे. एक मनुष्य जमिनीवर बी विखरतो. रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही. कारण जमीन स्वतः पीक उत्पन्न करते—पहिल्यांदा अंकुर, कणसे आणि मग कणसात दाणे भरतात. अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.” आणखी ते म्हणाले, “परमेश्वराचे राज्य कसे आहे किंवा कोणता दाखला देऊन त्याचे वर्णन करता येईल? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो पृथ्वीवरील सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी, तो दाणा वाढून त्याचे झाड होऊन बागेतील सर्वात मोठे झाड होते आणि त्याच्या मोठ्या फांद्यांवर आकाशातील पक्षी विसावा घेऊ शकतात.” अशाच प्रकारच्या अनेक दाखल्यांद्वारे जसे ते समजू शकतील तसे येशू त्यांच्यासोबत वचनाद्वारे बोलले. ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. परंतु एकांतात मात्र ते आपल्या शिष्यांना सर्व स्पष्ट करून सांगत असत. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला धमकाविले व लाटांना, “शांत हो” असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले. त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?” शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?”

सामायिक करा
मार्क 4 वाचा

मार्क 4:21-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणखी तो त्यांना म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको.” पुन्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा; ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हांला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.” आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.” आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला, तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.” असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता; तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?” तेव्हा त्याने उठून वार्‍याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?” तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.”

सामायिक करा
मार्क 4 वाचा

मार्क 4:21-41 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आणखी त्याने त्यांना विचारले, “दिवा मापाखाली किंवा खाटेखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? जे गुप्त ठेवण्यात आले आहे, ते प्रकट केले जाईल; जे झाकून ठेवण्यात आले आहे, ते उघड केले जाईल. ज्याला ऐकण्यासाठी कान असतील, त्याने ऐकावे!” पुढे तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हांला दिले जाईल आणि त्याहीपेक्षा अधिक दिले जाईल; कारण ज्याच्याकडे आहे, त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही, त्याचे असेल नसेल तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल.” आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते - प्रथम अंकुर, मग कणीस, नंतर कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.” येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी पेरल्यावर उगवून सर्व रोपट्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की, आकाशातील पक्ष्यांना त्याच्या सावलीत वसती करता येते.” असे पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्‍तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. दाखल्याशिवाय तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तरी पण एकान्ती तो त्याच्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.” शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते. अचानक तेथे मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळू लागल्या की, तो पाण्याने भरू लागला. मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?” त्याने उठून उभे राहून वाऱ्याला हुकूम सोडला, “निवांत हो!” आणि लाटांना म्हटले, “शांत व्हा!” वारा पडला व अगदी निवांत झाले. त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्‍वास ठेवत नाही काय?” ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.”

सामायिक करा
मार्क 4 वाचा