मार्क 3:7-21
मार्क 3:7-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला. यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका. मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे. व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा. मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले. अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला. मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना. त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.
मार्क 3:7-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता. येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते. तिथे गर्दी असल्यामुळे व येशूंच्या भोवती लोकांची गर्दी थांबविण्यासाठी त्यांनी शिष्यांना एक लहान होडी तयार ठेवावी असे सांगितले. कारण त्यांनी पुष्कळांना बरे केले होते, त्यामुळे जे लोक आजारी होते ते येशूंना स्पर्श करावा म्हणून पुढे रेटत होते. जेव्हा अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात!” परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका. येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले. तेव्हा त्यांनी बारा जणांची निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा. त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले), जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता), आंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला. येशू एका घरात गेले आणि समुदायाने पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना भोजन करण्यासही वेळ मिळेना. येशूंच्या कुटुंबीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.”
मार्क 3:7-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला; यहूदीया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सीदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यांतूनही मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्यांविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.” तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.” मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठी की, त्यांनी त्याच्याबरोबर असावे, व रोग बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी, व त्याला धरून देणारा यहूदा इस्कर्योत. मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते.
मार्क 3:7-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला आणि यरुशलेम, इदोम व यार्देनच्या पलीकडचा विभाग, तसेच सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा परिसर, ह्यांतून मोठा लोकसमुदाय येशूच्या महान कार्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. गर्दीमुळे स्वतः चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवायला सांगितले. त्याने अनेकांना बरे केले होते आणि जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करायला एकमेकांना ढकलत त्याच्याकडे जात होते. जेव्हा भुते त्याला पाहत तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, “तू देवाचा पुत्र आहेस.” मात्र तो भुतांना ताकीद देऊन सांगत असे, “मला प्रकट करू नका.” येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले. आपल्याबरोबर राहण्यासाठी व संदेश द्यायला पाठवण्यासाठी, तसेच रोग बरे करायचा व भुते काढायचा अधिकार देण्यासाठी, त्याने बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित म्हणूनही संबोधिले. त्याने पुढील बारा जणांची नेमणूक केली:शिमोन (येशूने त्याला पेत्र हे नाव दिले); जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले); अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी व येशूचा विश्वासघात करणारा यहुदा इस्कर्योत. नंतर येशू घरी आला, तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, येशूला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला घेऊन जायला आले कारण त्याला वेड लागले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते.