मार्क 15:22-32
मार्क 15:22-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते. जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःला वाचव. तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही! या इस्राएलाचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
मार्क 15:22-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते. एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता: यहूद्यांचा राजा. त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला. जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव!” त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षकांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली.
मार्क 15:22-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी ‘त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.’ त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. ‘यहूद्यांचा राजा’ असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.] मग जवळून जाणार्यायेणार्यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.” तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसांत थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही. इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती.
मार्क 15:22-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. त्यानंतर त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणते कपडे कोणी घ्यावे ह्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. ‘यहुदी लोकांचा राजा’, अशी त्याच्यावरील दोषारोपाची पाटी क्रुसावर लावली होती. त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले. [‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.] जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली ये!” तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही! इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता क्रुसावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आमचा विश्वास बसेल.” येशूबरोबर क्रुसावर खिळलेलेसुद्धा त्याची निंदा करत होते.