YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:26-50

मार्क 14:26-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले. नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.” नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.” पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना. तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.” आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले. घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले. नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली. तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:26-50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. “तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे: “मी मेंढपाळावर प्रहार करेन आणि मेंढरांची पांगापांग होईल. परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.” “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले. आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकूळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. “अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.” नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. मग ते तिसर्‍या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.” ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले. पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.” मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:26-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण आज रात्री माझ्यामुळे अडखळून पडाल; कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलात जाईन.” पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री, कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” तरी तो फार आवेशाने बोलत राहिला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही.” सर्व जणही तसेच म्हणत होते. नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या जिवाला’ मरणप्राय ‘अति खेद झाला आहे;’ तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.’ आणि तो म्हणत होता, “अब्बा, बापा, तुला सर्वकाही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; तेव्हा तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.” त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसर्‍या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले; घटका आली आहे; पाहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.” तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली. त्याला धरून देणार्‍याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्याशेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.” तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:26-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यानंतर एक स्तोत्र गाऊन ते तेथून ऑलिव्ह डोंगराकडे निघून गेले. येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझ्यामुऴे अडखळणार आहात, कारण असे लिहिले आहे, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ पण माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलमध्ये जाईन.” पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, आज रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र आवेशाने बोलला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व जणही तेच म्हणत होते. ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.” काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.” तो म्हणत होता, “पित्या, माझ्या पित्या, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. तो पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत, त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्याला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचेना. तिसऱ्या वेळी येऊन तो त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पुरे झाले! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.” येशू बोलत असताना बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली होती. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती, “मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा व त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली. तेथे शेजारी जे उभे होते, त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि उच्च याजकांच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे आणि तुम्ही मला धरले नाही, परंतु धर्मशास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक आहे.” त्यानंतर त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा