मार्क 12:28-44
मार्क 12:28-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञा पैकी महत्त्वाची अशी पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे. तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’ दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.” तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात. त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.” येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यानंतर त्यास प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही. येशू परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता, तो म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणातात ते कसे शक्य आहे? दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत, तू माझ्या उजवीकडे बैस.’ दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकसमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता. शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.” येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
मार्क 12:28-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणी एक नियमशास्त्र शिक्षक तिथे आला व त्याने त्यांचा वाद ऐकला. येशूंनी योग्य उत्तर दिले आहे, हे पाहून त्याने येशूंना विचारले, “सर्व आज्ञांपैकी महत्त्वाची कोणती आहे?” येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत. प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’ दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.” “योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे. त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.” त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत. नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?” कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता. येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते. ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.” येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले. मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती. ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने दान पात्रात इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरिबीतून सर्व देऊन टाकले—जी तिची उपजीविका होती.”
मार्क 12:28-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’ आणि ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.’ ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” तो शास्त्री त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’ आणि ‘संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे’ आणि ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती करणे’ हे सर्व ‘होमार्पण व यज्ञ’ ह्यांपेक्षा अधिक आहे.” त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात ते कसे? कारण दाविदाने स्वत: पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ दावीद स्वत: त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. आणखी तो आपल्या शिकवणीत त्यांना म्हणाला, शास्त्र्यांविषयी जपून राहा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणे, बाजारांत नमस्कार घेणे, आणि सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य बैठका ह्यांची आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात; त्यांना अधिकच शिक्षा होईल.” मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.”
मार्क 12:28-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांचा वाद ऐकून व त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून शास्त्र्यांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे. तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” तो शास्त्री म्हणाला, “गुरुवर्य, आपण ठीक बोललात. परमेश्वर एक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. तसेच संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ ह्यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.” त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून येशूला आणखी काही विचारण्याचे धाडस कुणाला झाले नाही. मंदिरात शिकवत असता येशूने प्रश्न विचारला, “ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात, हे कसे? कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” आणि जनसमुदाय हे आनंदाने ऐकत होता. पुढे तो आपल्या प्रबोधनात त्यांना म्हणाला, “शास्त्र्यांविषयी जपून राहा, त्यांना पायघोळ झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानांत राखीव आसने व मेजवानीत मानाच्या जागा मिळवायची आवड असते. ते विधवांची घरे बळकावतात व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात, त्यांना जबर शिक्षा होईल.” एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली. त्याने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावून म्हटले, “मी तुम्हांला सत्य सांगतो, हे जे दान टाकत आहेत, त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी त्यांच्या विपुलतेतून टाकले. परंतु हिने, तिच्याकडे उपजीविकेसाठी जे होते, ते सर्व टाकले.”