मार्क 11:1-10
मार्क 11:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की, “समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा. आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.” मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले. तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?” त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले. त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
मार्क 11:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा. ‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ” ते निघाले व त्यांना एका रस्त्यावर फाटकाच्या बाहेर शिंगरू बांधलेले आढळले. ते सोडू लागले, त्यावेळी उभ्या असलेल्या काहींनी विचारले, “तुम्ही बांधलेल्या शिंगरूचे काय करत आहात?” येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्या माणसांनी त्यांना जाऊ दिले. जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले. अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या. मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!”
मार्क 11:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की, “समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा. आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’ तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, “शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात?” येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले; तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’ आमचा बाप दावीद ह्याचे [प्रभूच्या नावाने] येणारे राज्य धन्यवादित असो; ‘उर्ध्वलोकी होसान्ना.”’
मार्क 11:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मग ते यरुशलेमजवळ ऑलिव्ह डोंगराजवळ, बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. त्याने त्याच्या शिष्यांपैकी दोघांना पुढे पाठवताना असे सांगितले, “समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच तुम्हांला ज्याच्यावर कधीच कोणी बसले नाही, असे एक शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. तुम्ही असे का करता, असे जर कोणी तुम्हांला विचारले, तर असे सांगा की, प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेच ते परत पाठवील.” ते निघाले. रस्त्यावर एका घराच्या दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडायला सुरुवात केली. तेथे उभ्या असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना विचारू लागले, “तुम्ही शिंगरू का सोडता?” येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी त्यांना उत्तर दिले आणि लोकांनी त्यांना नेऊ दिले. त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला. पुष्कळ लोकांनी त्यांची वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डहाळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्य असो! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”