मीखा 5:1-5
मीखा 5:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यरूशलेमेतील लोकहो, आता युध्दामध्ये एकत्र या. तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील. पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे. यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल, आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील. तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल. आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल. अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील, तेव्हा आम्ही सात मेंढपाळ आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.
मीखा 5:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील. “परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.” म्हणून प्रसूती वेदनेत असलेली एका मुलाला जन्म देईपर्यंत आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत इस्राएलचा त्याग केला जाईल. तो याहवेहच्या सामर्थ्याने, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेल आणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील, कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांना याहवेहची महानता कळेल. ते पुरुष आपली शांती असतील जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतील आणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील, तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ, आठ देखील सेनापती उभे करू
मीखा 5:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे लष्कराच्या स्वामिनी,1 तू आपले लष्कर आता जमा कर, त्याने आम्हांला वेढा घातला आहे; ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत. हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. हा पुरुष आम्हांला शांती होईल; जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याच्याविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू.