मत्तय 9:9-13
मत्तय 9:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला. येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?” येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे. मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
मत्तय 9:9-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला. नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?” हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”
मत्तय 9:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला. नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?” हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.”
मत्तय 9:9-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकात नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला. एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले होते. हे पाहून परुशी येशूच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू अशा जकातदार व पापी लोकांबरोबर का जेवतो?” परंतु हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर आजाऱ्यांना असते. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”