मत्तय 9:2-7
मत्तय 9:2-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.” काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.” येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” मग तो उठून आपल्या घरी गेला.
मत्तय 9:2-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!” त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता? यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला.
मत्तय 9:2-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणाएका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ असे बोलणे, किंवा ‘उठून चाल’ असे बोलणे, ह्यांतून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला) ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” मग तो उठून आपल्या घरी गेला.
मत्तय 9:2-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच वेळी तेथे खाटेवर पडून असलेल्या एका पक्षाघाती माणसाला काही लोकांनी त्याच्याकडे आणले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.” त्या वेळी कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करीत आहे.” येशू त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का आणता? कारण ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’, असे म्हणणे, ह्यांतील अधिक सोपे कोणते? पण मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करायचा अधिकार पृथ्वीवर आहे, हे तुम्हांला समजावे.” मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, तुझी खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.” तेव्हा तो उठून त्याच्या घरी गेला.