YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 8:23-34

मत्तय 8:23-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले. तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत. तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.” मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?” तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, “जा,” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला. मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:23-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले. तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते. तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!” येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले. ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!” सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या देशात येशू आले, तेव्हा भुताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते. येशूंना पाहून ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला आमच्याशी काय काम? ठरलेल्या वेळेपूर्वीच तुम्ही आम्हाला छळण्यास आले आहे का?” दूर अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी येशूंना विनंती केली, “तुम्ही आम्हाला हाकलून देणार असाल तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची परवानगी द्या.” येशू म्हणाले, “जा.” तत्काळ भुते बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली व तो सर्व कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात बुडून मेला. डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात धावत गेले आणि त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितली. भुतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हे त्यांनी लोकांना सांगितले. तेव्हा नगरातील सर्व लोक येशूंना भेटण्यास गेले आणि त्यांना भेटल्यावर, त्यांच्या भागातून निघून जावे अशी येशूंना विनंती केली.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:23-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; परंतु तो झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो.” तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!” मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?” तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, “तू जर आम्हांला काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.” त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटण्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:23-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. एकाएकी त्या सरोवरात इतके प्रचंड वादळ उठले की, तारू लाटांखाली बुडू लागले. येशू मात्र झोपला होता. ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभो, आम्ही बुडत आहोत, आम्हांला वाचवा.” तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले. हे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?” तो सरोवराच्या पलीकडे गदराच्या हद्दीत आल्यावर दोन भूतग्रस्त कबरींतून निघून त्याच्याकडे आले. ते इतके भयंकर होते की, त्या वाटेने कुणीही जाऊ शकत नसे. अचानक ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला छळायला येथे आला आहेस काय?” तेथून थोड्याशा अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. ती भुते त्याला विनंती करू लागली, “तू जर आम्हांला बाहेर काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.” त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली आणि पाहा, तो कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात बुडून मेला. तेव्हा कळप चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांचे सर्व वृत्त लोकांना सांगितले. हे ऐकून सर्व नगर येशूला पाहायला आले व त्याला पाहिल्यावर त्यांनी येशूला त्यांच्या नगराबाहेर जाण्याची विनंती केली.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा