मत्तय 6:24-29 - Compare All Versions
मत्तय 6:24-29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही. म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत, तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता.
मत्तय 6:24-29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही. “मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे, किंवा काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी, किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय? आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का? शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय? “आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.
मत्तय 6:24-29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.
मत्तय 6:24-29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकणार नाही. म्हणूनच मी तुम्हांला सांगतो, तुमच्या जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही काय खावे व काय प्यावे आणि तुमच्या शरीराविषयी, म्हणजे तुम्ही काय परिधान करावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीवन आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक मौल्यवान आहे किंवा नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा; ते पेरणी करत नाहीत; कापणी करत नाहीत की कोठारांत धान्य साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाहीत? चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता!