मत्तय 6:2-4
मत्तय 6:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल.
मत्तय 6:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्या वाजवून जाहीर करू नका, जसे ढोंगी रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे. तुम्ही गरजवंतास देता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.
मत्तय 6:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल.
मत्तय 6:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे प्रार्थनामंदिरात व रस्त्यांवर लोकांपुढे स्तोम माजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू जेव्हा दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस. तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.