मत्तय 3:7-12
मत्तय 3:7-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या; आणि अब्राहाम तर ‘आमचा पिता आहे’, असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका; कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे. आणि झाडांच्या मुळांशी आताच कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
मत्तय 3:7-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु पुष्कळ परूशी व सदूकी लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले? जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. आमचा पिता तर अब्राहाम आहे असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे. कुर्हाड झाडांच्या मुळावर आधी ठेवलेली आहे, आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.” योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”
मत्तय 3:7-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले? ह्यास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”
मत्तय 3:7-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परुशी व सदूकी ह्यांच्यापैकी अनेकांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून दूर पळायला तुम्हांला कोणी सावध केले? पश्चात्तापाला अनुरूप असे वर्तन करा. ‘अब्राहाम आमचा पूर्वज आहे’, असे म्हणून तुम्हांला स्वतःचे समर्थन करता येईल, असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो, देव ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे. आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड रोवलेली आहे. जे चांगले फळ देत नाही, असे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल. तुम्ही पश्चात्ताप केला, हे दर्शवण्यासाठी मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, तो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे. त्याची पादत्राणे उचलायचीदेखील माझी पात्रता नाही. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. त्याने तो त्याच्या खळ्यातील धान्य पाखडून गहू कोठारात साठवील पण भूस मात्र कधीही न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”