मत्तय 27:27-31
मत्तय 27:27-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली. त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला. मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!” आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले.
मत्तय 27:27-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले. येशूंची अशी थट्टा केल्यावर त्यांनी झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता घेऊन गेले.
मत्तय 27:27-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला; काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले.
मत्तय 27:27-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याला जांभळा झगा घातला आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून ते उपहासाने म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले. अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून तो झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला घेऊन गेले.