मत्तय 27:1-5
मत्तय 27:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला. तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
मत्तय 27:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले. ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली. “मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले. यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला.
मत्तय 27:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली; आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.” मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला.
मत्तय 27:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
भल्या पहाटे सर्व मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी येशूला ठार मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले. त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले. येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला, “मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.” त्याने ती नाणी मंदिरात टाकली. तो निघून गेला व त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.