मत्तय 27:1-31
मत्तय 27:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला. तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.” तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली. त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले. मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.” मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.” पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला. म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?” परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला. वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता. म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” कारण त्यास कळले होते की, त्यांनी त्यास मत्सराने धरून दिले होते. तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.” पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले. राज्यपालाने त्यांना विचारले, “मी या दोघांतून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, “बरब्बाला.” पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!” आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!” लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.” सर्व लोक म्हणू लागले, “त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.” मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले. नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली. त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला. मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!” आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले.
मत्तय 27:1-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले. ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली. “मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले. यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला. महायाजकांनी ते पैसे गोळा केले आणि ते म्हणाले, “हे पैसे आपल्याला मंदिराच्या खजिन्यात भरता येणार नाहीत, हे नियमाविरुद्ध आहे. कारण हे रक्ताचे पैसे आहेत.” म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले, आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.” येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हटले तसे.” महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले. “हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले, परंतु येशूंनी एकाही आरोपाचे उत्तर दिले नाही. राज्यपालासाठी ही खूप आश्चर्यचकित गोष्ट होती. आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती. या वर्षी येशू बरब्बास नावाचा एक प्रसिद्ध गुन्हेगार तुरुंगात होता. त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली असताना, पिलाताने लोकांना विचारले, “सणानिमित्त मी तुमच्यासाठी कोणाला सोडून देऊ? येशू बरब्बास किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूंना?” कारण पिलाताला कळले होते की, लोकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले होते. त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.” परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा” अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे म्हणून समुदायाचे मन वळविले. राज्यपालांनी विचारले, “या दोघांपैकी मी तुम्हाकरिता कोणाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे?” जमावाने उत्तर दिले, “बरब्बाला सोडावे!” “मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले. “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!” पिलाताला समजले की आपण काहीही करू शकत नाही, दंगल वाढत आहे असे त्याने पाहिले, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि सर्व जमावापुढे आपले हात धुतले. “मी या माणसाच्या रक्ताबाबत निर्दोष आहे.” तो म्हणाला, “ही तुमची जबाबदारी आहे.” यावर सर्व जमाव ओरडला, “त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.” तेव्हा पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता सैनिकांच्या स्वाधीन केले. मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले. येशूंची अशी थट्टा केल्यावर त्यांनी झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता घेऊन गेले.
मत्तय 27:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली; आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.” मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.” मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे की, “‘आणि ज्याचे मोल इस्राएलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनी घेतले आणि परमेश्वराने’ मला ‘आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.”’ मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने त्याला म्हटले, “आपण म्हणता तसेच.” मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता. म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?” कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.” इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. सुभेदाराने त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.” पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.” सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.” तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले, व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला; काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले.
मत्तय 27:1-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
भल्या पहाटे सर्व मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी येशूला ठार मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले. त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले. येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला, “मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.” त्याने ती नाणी मंदिरात टाकली. तो निघून गेला व त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. परंतु मुख्य याजकांनी ती नाणी गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे धर्मशास्त्राला धरून नाही; कारण हे रक्ताचे मोल आहे.” त्यांनी आपसात विचारविनिमय करून त्या नाण्यांतून परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. त्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. जे वचन यिर्मया संदेष्ट्याद्वारे सांगितले होते, ते त्या वेळी पूर्ण झाले. ते असे: ज्याचे मोल इस्राएलच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले होते, त्याचे मोल म्हणजे ती तीस चांदीची नाणी त्यांनी घेतली आणि परमेश्वराने मला निर्देश दिल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी ती वापरली. येशूला रोमन राज्यपालांच्या पुढे उभे केले असता राज्यपालांनी त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.” परंतु मुख्य याजक व वडीलजन हे त्याच्यावर दोषारोप करत असता तो काहीच बोलला नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे किती गोष्टींची तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, हे तुला ऐकू येत नाही काय?” परंतु त्याने एकाही आरोपाबद्दल काही उत्तर दिले नाही, ह्याचे राज्यपालांना फार आश्चर्य वाटले. ओलांडण सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची राज्यपालांची प्रथा होती. त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता. लोक जमल्यावर पिलातने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की, ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?” यहुदी अधिकाऱ्यांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला, “त्या निर्दोष मनुष्याच्या बाबतीत आपण मध्ये पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.’ इकडे मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूला मरणदंड मिळावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. परंतु राज्यपालांनी त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.” पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” नंतर त्याने विचारले, “का बरे? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरडा करत म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गदारोळ होत आहे, असे पाहून पिलातने पाणी घेतले व लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.” सर्व लोकांनी उत्तर दिले, “त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलाबाळांवर असो.” तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याला जांभळा झगा घातला आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून ते उपहासाने म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले. अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून तो झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला घेऊन गेले.