YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:37-42

मत्तय 26:37-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला. येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:37-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहानला बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.” मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून त्यांनी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.” यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “तुम्ही माणसे एक तासभरही माझ्याबरोबर जागे राहू शकला नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” येशू पुन्हा गेले आणि प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, जर हा प्याला मी प्याल्याशिवाय दूर करता येणार नसेल, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:37-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” आणखी त्याने दुसर्‍यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:37-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला. “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” त्याने दुसऱ्यांदा पुढे जाऊन प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, मी प्यायल्याशिवाय हा प्याला दूर केला जाणार नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”

सामायिक करा
मत्तय 26 वाचा