YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 24:29-51

मत्तय 24:29-51 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील. अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते. त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे. मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत. पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे! मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील. पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे, तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल. मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

सामायिक करा
मत्तय 24 वाचा

मत्तय 24:29-51 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’ “मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील. तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल. “आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी जवळ, दारातच आहे हे समजून घ्या. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. “तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल. शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही. पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल. “तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो. धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.

सामायिक करा
मत्तय 24 वाचा

मत्तय 24:29-51 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’ तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल; मग ‘पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील’ आणि ते ‘मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील; ‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्‍ही दिशांकडून जमा करतील.’ अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हांला खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा तारवात गेला’ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हांला खचीत सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु ‘माझा धनी येण्यास विलंब लागेल’ असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.

सामायिक करा
मत्तय 24 वाचा

मत्तय 24:29-51 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्या दिवसांतील संकटांनंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल. चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातल्या शक्ती डळमळतील. त्यानंतर मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील व ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने व महान वैभवाने येताना पाहतील. कर्ण्याच्या नादाबरोबर तो त्याच्या दूतांना चोहीकडे पाठवील व ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करतील. अंजिराच्या झाडापासून एक दाखला शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ माझ्या पित्याला माहीत आहे. नोहाच्या दिवसांत घडले होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत, नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुष लग्न करत होते व लग्न लावून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैंकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही. परंतु कोणत्या प्रहरी चोर येईल, हे घरधन्याला कळले असते, तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. तर मग तुम्हीही जागृत राहा; कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. असा कोण विश्वासू व सुज्ञ दास आहे की, ज्याला त्याचा धनी त्याच्या परिवाराला योग्य वेळी भोजन देण्यासाठी नेमतो? त्याचा धनी येईल त्यावेळी जो दास, कार्यमग्न असलेला आढळेल, तो धन्य! मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्याला तो आपल्या सर्व मालमत्तेवर नेमील. परंतु धनी यायला विलंब लागेल, असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल व त्याच्या साथीदारांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल तर तो अपेक्षा करत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन धन्याची सेवा करण्याचे केवळ ढोंग करणाऱ्या दासांमध्ये त्याला हाकलून लावील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.

सामायिक करा
मत्तय 24 वाचा