मत्तय 24:1-28
मत्तय 24:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले. परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.” मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये. कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील. सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत. ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल. सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल. तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.) त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल. जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील. त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे. एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.
मत्तय 24:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू मंदिरातून बाहेर पडले व चालत असता त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.” येशू मंदिराच्या समोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, शिष्य त्यांच्याकडे एकांतात आले आणि विचारले, “या घटना केव्हा घडतील आणि तुमच्या येण्याचे आणि या युगाच्या समाप्तीची चिन्हे काय असतील हे आम्हाला सांगा.” येशूंनी त्यांना म्हटले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. तुम्ही लढायासंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, पण त्यामुळे घाबरू नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे. कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील. या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत. “छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळजण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील. दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल. सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल. “संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे— त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये. जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण ते दिवस इतके भयानक असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत. “ते दिवस जर कमी केले गेले नसते, तर कोणी वाचले नसते. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. त्या काळात ‘येथे ख्रिस्त आहे,’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. पाहा मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेले आहे. “जर कोणी तुम्हाला सांगेल, ‘तो तिथे रानात आहे,’ तर तिकडे जाऊ नका किंवा तो तिथे ‘आतील खोलीत आहे,’ तर विश्वास ठेवू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल. जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.
मत्तय 24:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.” तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकान्ती येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये, म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’ असे म्हणतील व अनेकांना फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण ‘असे होणे अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत. तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे; जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’ पाहा, मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे. ह्यास्तव कोणी तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो अरण्यात आहे,’ तर जाऊ नका; तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो आतल्या खोल्यांत आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.
मत्तय 24:1-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू मंदिरातून बाहेर पडत असता त्याचे शिष्य मंदिराच्या इमारती दाखवायला त्याच्याजवळ आले. येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला निक्षून सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की, जो पाडला जाणार नाही.” तो ऑलिव्ह डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे खाजगीत येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा घडतील आणि तुमच्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध असा.” पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’, असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील. तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही. राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ असेल. तेव्हा तुमचे हाल करण्याकरता तुम्हांला धरून नेण्यात येईल व तुम्हांला ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. त्या वेळी पुष्कळ जण श्रद्धेपासून ढळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे अनेकांना फसवतील. दुष्टपणा वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचा उद्धार होईल. सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून देवराज्याच्या ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली जाईल आणि नंतर शेवट होईल. दानिएल संदेष्ट्याद्वारे नमूद केलेले ओसाड अमंगल दुश्चिन्ह पवित्र स्थानात तुम्ही पाहाल. (वाचकाने ह्याचा अर्थ समजून घ्यावा.) जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो छपरावर असेल, त्याने त्याच्या घरातून काही वस्तू बाहेर काढायला खाली उतरू नये. जो शेतात असेल त्याने त्याचे कपडे घेण्याकरता परत जाऊ नये. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील व ज्या अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! हिवाळ्यात किंवा साबाथ दिवशी तुमची धावपळ होऊ नये म्हणून प्रार्थना करा. जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आली नाही व पुढे कधीही येणार नाही, अशी भीषण आपत्ती त्या वेळी येईल. ते दिवस कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. परंतु निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. त्या वेळी जर कोणी तुम्हांला म्हणेल, “पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे’,तर ते खरे मानू नका. कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील. सावध राहा. मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे. कोणी तुम्हांला म्हणतील, “पाहा, तो अरण्यात आहे’, तर जाऊ नका, किंवा ‘तो एका आतील ठिकाणी लपलेला आहे’, तर ते खरे मानू नका. जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकत जाते, तशा प्रकारे मनुष्याचा पुत्र येईल. जेथे मढे, तेथे गिधाडे.