YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 23:23-39 - Compare All Versions

मत्तय 23:23-39 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या. तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात. अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता. आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो. पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा. तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हास खरे सांगतो; या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.” “हे, यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पाहा, आता तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड होईल. मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस.”

सामायिक करा
मत्तय 23 IRVMAR

मत्तय 23:23-39 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तुम्हा परूश्यांचा व नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे या मसाल्यांचा दशांश देता, परंतु न्याय, दया आणि विश्वासूपणा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी तर तुम्ही कराव्‍यात, पण त्याचबरोबरच ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता, पण उंट गिळून टाकता. “तुम्हा परूश्यांचा आणि नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही आपले ताट व वाटी बाहेरून स्वच्छ करता पण तुमची मने लोभ व असंयम यांनी भरलेली आहे. आंधळ्या परूश्यांनो! पहिल्यांदा थाळी व प्याला आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरून देखील स्वच्छ होतील. “अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुन्याचा लेप लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. ज्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून कबरांसारखे आहात, ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले. “अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडीलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’ पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून करणार्‍या वाडवडीलांची संताने आहात. मग जा आणि ज्याचा तुमच्या पूर्वजांनी आरंभ केला होता ते पूर्ण करा. “अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल? यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवित आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल. नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल. मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ”

सामायिक करा
मत्तय 23 MRCV

मत्तय 23:23-39 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता! अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता; आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्‍यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल; ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील. यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’ मी तुम्हांला सांगतो, आतापासून ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.”

सामायिक करा
मत्तय 23 MARVBSI

मत्तय 23:23-39 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व श्रद्धा ह्यांकडे दुर्लक्ष करता. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्यादेखील तुम्ही करायच्या होत्या. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता! अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतून ती अत्याचार व असंयम ह्यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून त्या मेलेल्यांच्या हाडांनी व घाणीने भरलेल्या असतात. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात. अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि दावा करता, “आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता. तर मग, तुमच्या पूर्वजांचे कृत्य तुम्ही पूर्ण करा. अहो सापांनो आणि सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो, तुम्ही त्यांच्यातील काही जणांना ठार माराल व क्रुसावर खिळाल आणि इतरांना तुम्ही तुमच्या सभास्थानांत फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल. म्हणून नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर सांडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर येईल. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या सर्व कृत्यांची शिक्षा आजच्या पिढीला भोगावी लागेल. यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या नगरी, तुझ्याकडे पाठवलेल्यांवर धोंडमार करणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची माझी कितीदा तरी इच्छा होती. पण तू मला तसे करू दिले नाहीस. पाहा, तुमचे घर तुम्हांला सोडून द्यावे लागेल आणि ते ओस पडेल. कारण मी तुम्हांला सांगतो, आतापासून पुढे, “जो प्रभूच्या नावाने येत आहे, तो धन्य’ असे तुम्ही म्हणू लागाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 23 MACLBSI