मत्तय 22:23-46
मत्तय 22:23-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. शेवटी ती स्त्री मरण पावली. आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.” जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले. येशूने सदूकी लोकांस निरूत्तर केले. असे ऐकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” येशूने उत्तर दिले, “‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’ ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.” म्हणून परूशी एकत्र जमले असताना, येशूने त्यांना प्रश्न केला. येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.” त्यावर येशू त्यांना म्हणाला, “तर दावीद देवाच्या आत्म्याद्वारे, त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, “मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.” आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो? तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसानंतर त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.
मत्तय 22:23-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले. “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. पण हीच गोष्ट दुसर्या व तिसर्या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली. सर्वात शेवटी ती स्त्री मरण पावली. जेव्हा, पुनरुत्थान होईल तेव्हा ती कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता. पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय? ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.” सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली. येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले. कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला: “गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?” येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’ हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे. यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ सर्व नियम आणि संदेष्ट्यांची शिकवण या दोन आज्ञांवरच आधारित आहे.” एकदा परूशी लोक एकत्र गोळा झाले असताना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” “तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले. येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो? “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?” यावर त्यांना काही उत्तर देता येईना आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
मत्तय 22:23-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने सांगितले आहे की, ‘जर एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ आमच्यामध्ये सात भाऊ होते; त्यांतला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले. आणि सर्वांमागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.” हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले. त्याने सदूक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परूशी एकत्र जमले. आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” येशू त्याला म्हणाला, “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’ ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” परूशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “दाविदाचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?” तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्यास कोणीही धजला नाही.
मत्तय 22:23-46 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले, “गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, जर एखादा मनुष्य मूलबाळ नसता निधन पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले आणि सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय? ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.” हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला. येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले. त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, “गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’ ही महान व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” परुशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा वंशज आहे?” ते त्याला म्हणाले, “दावीदचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग पवित्र आत्म्याने त्याला प्रभू असे म्हणण्याची प्रेरणा दावीदला कशी दिली? दावीद म्हणाला: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?” कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही आणि त्या दिवसापासून त्याला आणखी प्रश्न विचारायला कोणीही धजला नाही.