मत्तय 2:3-8
मत्तय 2:3-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की; ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’” मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.”
मत्तय 2:3-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?” “यहूदीयातील बेथलेहेमात,” त्यांनी उत्तर दिले, “कारण संदेष्ट्याने असे लिहिले आहे: “ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ” मग हेरोदाने त्या खगोल शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि तारा नक्की कोणत्या वेळी प्रकट झाला याची माहिती मिळविली. मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.”
मत्तय 2:3-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले; आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?” ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की, ‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’ तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली; आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.”
मत्तय 2:3-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले. त्याने सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे?” ते त्याला म्हणाले, “यहुदियातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याद्वारे असे लिहिले आहे: हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस, असे मुळीच नाही. माझ्या इस्राएली लोकांचे नेतृत्व करील असा सरदार तुझ्यातून उदयास येईल.” हेरोदने पूर्वेकडील ज्ञानी लोकांना गुप्तपणे बोलावून, तारा दिसू लागल्याची निश्चित वेळ त्यांच्याकडून काळजीपूर्वक विचारून घेतली. नंतर त्याने त्यांना बेथलेहेमला पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बाळाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याची उपासना करीन.”