YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 19:1-9

मत्तय 19:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदीया प्रांतात गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांस येशूने बरे केले. काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय? येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले. आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये.” परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?” येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा

मत्तय 19:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आपले बोलणे संपविल्यावर येशू गालील प्रांत सोडून यार्देन नदीच्या पार यहूदीया प्रांतात आले. लोक मोठ्या संख्येने त्यांच्यामागे जात होते आणि त्यांनी त्यांना बरे केले. काही परूशी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तिथे आले. त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने प्रत्येक किंवा कोणत्याही कारणासाठी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?” येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’ आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.” “मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?” यावर येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने तुम्हाला आज्ञा दिली. परंतु मुळात परमेश्वराची तशी इच्छा नव्हती. मी तुम्हाला सांगतो, व्यभिचाराच्या कारणाशिवाय जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा

मत्तय 19:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतात गेला; तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. मग परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’, व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’ ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” ते त्याला म्हणाले, “तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा

मत्तय 19:1-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

हे प्रबोधन केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देन नदीच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. लोकांचा समुदाय त्याच्यामागे गेला आणि त्याने त्यांना तेथे बरे केले. त्यानंतर काही परुशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने विचारू लागले, “कोणत्याही कारणावरून पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?” त्याने उत्तर दिले, “तुम्ही हे वाचले नाही काय?: त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना सुरुवातीला स्त्री व पुरुष असे निर्माण केले, त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. परिणामी ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.” ते त्याला म्हणाले, “तर मग सूटपत्र देऊन तिला सोडून द्यावे, असा कायदा मोशेने कसा दिला?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला तुमच्या बायका सोडून देण्याची परवानगी दिली, पण प्रारंभी तसे नव्हते. मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा