मत्तय 17:1-9
मत्तय 17:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.” येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते. तेव्हा येशूजवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशूशिवाय दुसरे कोणीही दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.”
मत्तय 17:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले; तिथे त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले, त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.” पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!” ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले. पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!” जेव्हा त्यांनी वर पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांना कोणीही दिसले नाही. ते डोंगरावरून खाली उतरत असताना येशूंनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जे काही पाहिले, ते मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
मत्तय 17:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकान्ती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.” हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” मग त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, ‘मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका.’
मत्तय 17:1-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. पेत्र म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आपली इच्छा असल्यास मी येथे तीन मंडप उभारतो - आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” तो बोलत असताना प्रकाशमान मेघाने त्यांच्यावर छाया धरली आणि मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याच्याविषयी मी प्रसन्न आहे. ह्याचे तुम्ही ऐका.” हे ऐकून शिष्य इतके भयभीत झाले की, ते पालथे पडले. येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आदेश दिला, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”