मत्तय 14:13-23
मत्तय 14:13-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले. मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.” मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच. मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.
मत्तय 14:13-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले. जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्यांना बरे केले. संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.” येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या. जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही. लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते.
मत्तय 14:13-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला; हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायीपायी गेले. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्यांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावांत जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया व मुलेदेखील होतीच. नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता.
मत्तय 14:13-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले. तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या. जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणाऱ्यांमध्ये सुमारे पाच हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले होती, ती निराळीच. “मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले. लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता.